Wednesday, July 2, 2014

व्रत योगियाचे


गुलमोहरावर पहिली कविता २०१० मध्ये झाली. त्याचाच हा sequel मानावा ! मूळ कविता इथे पहा - तिचे नाव होते एकाकी योगी -ती कविता वाचल्यावर यातील संदर्भ नीट लागतील.

हा स्थितप्रज्ञ पेटुनि अजूनी राही
पर त्याला याचा आठव येतच नाही

तो बरसून गेला वसंत समयी जेव्हा
केशरी सडा मग पडला होता तेव्हा

परि गुलमोहर ना रुसला वर्षावाने
योगी कैसा हा बधेल त्या बदलाने

तप पुष्पांचे हे अविरत चालू राही
ही समस्त सृष्टी त्याची वाटच पाही


ही तृषार्त धरणी करते अशी प्रतीक्षा
तो पाउस घेतो भलती कठीण परीक्षा


जोवरी न येई सोसाट्याचा वारा
ना गर्जती घन, ना धो धो धो धो धारा

तप-तत्पर तोवर धैर्याने राहणे
कर्तव्या अधिकच निष्ठेने पाहणे

तोवरी धन्यता नाही तप्ततनूला
मूर्तिमंत धीरा दावीतसे जगताला

आसमंत-कोपातही न सोडी कर्म
योगिया-व्रताचे असे हेच ते मर्म