Sunday, June 28, 2009

केल्याने भटकंती -(मस्तानी तलाव) -२


कालच्या पावसाने तलाव हळूहळू भरायला सुरुवात झाली होती. लालसर चिखलाच्या त्या पाण्याने तलावाचा काही भाग भरला होता. "अरे ते बघ काय !" "साप दिसतोय की काय?" दीप आणि ओंकारच्या या बोलण्याने आम्ही आमच्या थेट खाली असलेल्या पाण्यात पाहू लागलो. तेथे फक्त साप नव्हता, त्या सापाने कोणालातरी पकडलं होतं. बेडूक की काय तो? हो बेडूकच.

पण एवढ्या उंचीवरून आम्हाला ते काही नीटसं दिसेना! तिथे लगेचच खाली दुसरी एक जागा त्या तलावाच्या तटबंदीत होती. एक मजलाच म्हणा हवं तर. आम्ही लगेच तिथे उतरलो. अगदी उकिडवं बसून ते नेमकं काय करतायत पाहू लागलो. सापाने आपल्या जबड्यात त्या बेडकाला पकडलं होतं आणि तो बेडूक मोठ्या निकराची झुंज देत होता. सापाच्या तावडीतून स्वतःला सोडवू पाहत होता. आम्हाला एक गोष्ट कळेना की बेडूक एवढ्या ताकदीने कसा काय लढतोय? -- मिनिटं झाली! तरीही त्यांची कुस्ती संपेना! "अरे हा तर पाणदिवड आहे! निमविषारी साप! पण बेडकाला त्याचं विष पुरेसं होईल. आतापर्यंत तो संपायला हवा होता! पक्षीनिरीक्षक दीपने परत एकदा माहिती पुरवली. "हो का ! अरे बर! पण एकूण विषारी जाती चारच ना ?" इत्यादी प्रश्नोत्तरं चालू होऊन त्यात - मिनिटं गेली. एवढ्या वेळेपर्यंत त्या सापाने बेडकाला तलावाच्या तटबंदीशी असलेल्या आपल्या तटबंदीशी आणलं होतं. आता त्यांची कुस्ती "साँप की गली में" चालू झाली. आता तरी हे नाटक संपेल असं वाटलं होतं. पण छे! आता तर खेळाला अजूनच रंग चढला! एक वेळ तर अशी आली की बेडूक जवळजवळ सापाच्या तावडीतून सुटलाच होता. - मिनिटांनी आम्हीच कंटाळलो आता मात्र आम्ही ते बघायचा नाद सोडून दिला. (कॅमेऱ्याचं zoom यथातथाच असल्याने याचे फोटो काढण्यात काहीच अर्थ नव्हता!)

पण एक मात्र खरं, आपण नेहमी discovery/NatGeo वर असल्या गमती पाहतो; त्या प्रत्यक्ष बघायला जी मजा येते ती निराळीच! आणि मला एक जाणवलं ते असं की यासाठी काही फार दूर कुठे जंगल-सफारीवरच जायला पाहिजे असं नाही. जरा गावाकडे गेलं की असल्या अनेक गमती पहायला मिळतात. खरंच, multiplex मध्ये जाऊन सिनेमे पाहणं काय, किंवा TV समोर बसून स्वतःची करमणूक(स्वतःवर अत्याचार?) करवून घेणं काय; या सगळ्यात किती मोठ्या आनंदाला मुकलोत आपण असं वाटतं कधीकधी!

तटबंदीवरून जरा चक्कर टाकूया असं ठरवून आम्ही चार पावलं जातोय तोच आम्हाला एक भुयार दिसलं.

काळोखात गेलेल्या त्या पायऱ्या कुठे घेऊन जात असतील बरं आपल्याला. "पाहूयात का उतरून? नको, आत पाणी असलं म्हणजे?"- आलोकचा प्रश्न. "पाण्याचं काही नाही, आत जाम कुबट वास येत असेल! शिवाय वटवाघळं आली तर नसता ताप व्हायचा!" -इति दीप. शेवटी जरा बेताबेताने आत जाऊन बघू, असं ठरवत आम्ही पायऱ्या उतरू लागलो.

कालच्या पावसाने इथे आमच्या चपलांना चिखल चिकटू लागला. कोळ्यांची जाळी खूप होती तिथे. दीप, ओंकार, आलोक मी या क्रमाने आम्ही आत उतरलो. त्या तिथे गेल्यावर काहीच दिसत नव्हतं.पण - मिनिटात अस्पष्टसा अंदाज येऊ लागला. सगळेजण डोळे फाडफाडून जागेचा अंदाज घेऊ लागले.

मी सगळ्यात मागे असल्याने जरा - पायऱ्या वर होतो. पायऱ्यांवरूनच फोटो कसा घेता येतोय याचा विचार करत होतो. "अरे ते बघ इथून सरळ वरचं दिसतंय", दीप म्हणाला. त्या पायऱ्यांच्या शेवटी डाव्या बाजूला प्रकाश होता. तटबंदीच्या सर्वात वरच्या भागाला (भुयाराच्या छपराला म्हणा हवं तर) असलेल्या झरोक्यातून तो प्रकाश येतोय असं कळलं. उजवीकडे मात्र एक दीड-दोन फुटावरच भिंती दिसल्या.

हे असं बंदिस्त भुयार का बर केलं असेल? असो. ओंकार आणि आलोक आता वर निघून गेले, आणि मी तो झरोका पहायला भुयाराच्या शेवटी गेलो. एव्हाना मला दीपला तिथे चांगल्यापैकी दिसू लागलं होतं. झरोका तर मी पाहिला.
पण उजवीकडे पाहिल्यावर आता काही वेगळंच दिसलं- तिथे अजून पायऱ्या होत्या, खाली जाणाऱ्या! वारे किस्मत! मघाशी चुकून जरी कोणी उजवीकडे पाय टाकला असता तर तो कुठे जाऊन पडला असता कुणास ठाऊक! आमच्याकडे तर कोणाच्या मोबाइलमध्येही torch नव्हती !


"आता झालं एवढं धाडस पुरे" असं म्हणून आम्ही वर आलो. वर आल्यावर तिथल्या एका पोराकडून कळलं की ते भुयार त्या मघाचच्या आजोबांच्या देवळापाशी बाहेर पडतं.


तटबंदीवरून पुढे जाता जाता आम्हाला कळून चुकलं की तटबंदीचा पाहण्यासारखा मुख्य भाग अगदी थोडा आहे. थोडं पुढे तलावात जाणारा घाट आहे. पण तो मात्र बहुतांशी मोडकळीस आलाय. तिथून तलावाची तटबंदी मात्र अक्षरशः "सुरेख" दिसते. आता थोडं "तलावात" फिरून परत फिरू असं वाटलं. कारण आता त्या आटलेल्या तलावात अजून फारसं काही दिसत नव्हतं आणि आम्हाला परतही जायचं होतं.




पण त्यातही जाता जाता एका झाडाची नक्षीदार मुळं आम्हाला बघायला मिळाली.



साचलेल्या पाण्याच्या काठाने आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. आता तशी एकच गोष्ट बघायची राहिली होती ती म्हणजे तलावाच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या. आणि तिथे असणारे कोनाडे. "तिथेही काही भुयार वगैरे आहे का ते पाहू" ओंकार म्हणाला. मघाशी तलावाच्या आत असताना त्या पायऱ्यांचा "V" आकाराचा फोटो काढून झाला होता.



पण त्या १० बाय १० च्या कोनाड्यात ना कसलं देऊळ होतं ना कसली ना भुयार ना कसली विशेष व्यवस्था! मग शेवटी त्या पायऱ्यांवर बसून आम्ही आमचेच फोटो काढत सुटलो.



फोटोची पुरेशी हौस भागल्यावर आता मात्र आम्ही परत फिरायचं ठरवलं. ज्या देवळापाशी आम्हाला मस्तानी तलाव इथेच आहे असं कळलं तिथे अजून एक विहीर होती. मग तिच्यात डोकावून बघ, खोली किती, पाणी किती असले नित्य उद्योग चालू झाले असता त्या विहीरीत एका भुयाराचा शेवट दिसला. अरे, हेच ते भुयार ज्यात आम्ही मघाशी उतरलो होतो. पुन्हा एकदा उजवीकडच्या dead end मध्ये आम्ही अतीचिकीत्सक होऊन पाय ठेवला नाही याचं समाधान वाटलं! आपलाकडे अशा ऐतिहासिक भुयारांना बंद का करतात ते मला कळत नाही. आताचं हे भुयार तर जेमतेम - मजले खोल असेल. पण ऐतिहासिक ठिकाणं चांगली पर्यटन स्थळं बनू शकतात हे मुळी आम्हाला कळतंच नाही. अशा सुंदर ठिकाणी गेलं की या ठिकाणी अजून खूप करण्यासारखं आहे असं वाटत राहतं.

आता आम्ही परतीच्या वाटेवर होतो. गाड्यांपर्यंत पोहोचताच आम्ही निघालो, या वेळी मात्र गावातून जाणाऱ्या पक्क्या रस्त्याने. आता लवकरात लवकर पुणं गाठायचं होतं. पण तरीही साधं पाणीही बरोबर घेता दुपारी त्या तलावात पायपीट केलेली असल्याने ऊसाचा रस प्यायचा मोह काही आम्हाला आवरला नाही. हडपसर यायच्या आधीच एका गावात थांबून आम्ही ते "रसपान" केलं.

येताना मात्र फार वेळ लागला नाही. शिवाय आज पावसाने पूर्णच रजा घेतली होती. ऊन पावसाचा खो-खो सुध्दा आता मंदगतीने चालू होता. आता पावसाळ्यात परत येऊन तो तलाव पहावाच, तो पहायला मिळो असं म्हणत आम्ही आपापल्या घरी गेलो.