Thursday, March 19, 2009

बिरबलाची प्रवेश परीक्षा

राज्यातील विकासकामांना गती मिळण्यासाठी आता अनेक अभियंते, कर्मचारी, तंत्रज्ञ आणि कारागीर यांची आवश्यकता होती. नेहमीच्या निवडप्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे त्याऐवजी नवी प्रक्रिया घेण्यात यावी असे ठरले. सल्लागारांच्या मतानुसार बादशहाने नवी प्रक्रिया ताबडतोब लागू केली.

या प्रक्रियेत उमेदवारास एका प्रवेश परीक्षा द्यावी लागे. त्यानंतर त्याला तो करणार असलेल्या कामाबाबत प्रशिक्षित केले जाई. आणि त्यानंतर त्याची कामावर नियुक्ती होत असे.

पण राजाचा एखादा निर्णय वास्तवात लागू झाल्यावर काय वळण घेइल हे सांगता येणे कठीण. एक दिवस बादशहाकडे काहि मुखिया तक्रार करत आलेच,- ‘ जहाँपनाह, ही प्रवेश परीक्षा कसली आहे ? आमच्या गावात एक से एक हुशार कारागीर आहेत. त्यांच्याकडे कौशल्य आहे. परंतु केवळ परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार ते पद प्राप्त करु शकत नाही.’ ..... ‘बरोबर आहे हुजूर, ’ दुसरा एकजण सांगू लागला ,‘ आमच्याकडचे अनेक शहाणे तरुण केवळ ती परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने अभियंते होऊ शकत नाहीत. त्यात आमचं गाव अगदी आडवळणाचं, त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध विद्यालयांत खास प्रशिक्षण मिळतं; तिथवर आम्ही पोहोचू शकत नाही. परिणामी जे अभियंते व्हायचे, ते बिचारे गरीबीत दिवस काढताहेत, खाविंद! ’ .... आणखी एकाच्या मते ती परीक्षा फक्त त्या विद्यालयांना फायदेशीर ठरली, ज्या विद्यालयांमध्ये त्या परीक्षेचे प्रशिक्षण मिळत होते! ‘तेव्हा बादशहा सलामत, आपण या परीक्षेबाबत पुनर्विचार करावा ’ - सर्वांनी एकमुखाने मागणी केली.

बादशहाने लागलीच बिरबलास बोलावणे धाडले. गाह्राणी घेऊन आलेल्यांपैकी काही निवडक सदस्य आणि इतर काही सदस्य यांनी बिरबलासोबत पाहणी करावी असे फर्मान बादशहाने काढले.

झालं. आता प्रवेश परीक्षा रद्द होणार, पुन्हा पूर्वीप्रमाणे कामे मिळणार, नव्या प्रकारची परीक्षा द्यावी लागणार अशा अफवांचे पेव फुटले. या काळात उमेदवारांना मात्र कसरत करावी लागत होती. प्रवेश परीक्षेसोबत पूर्वीच्या परीक्षेचीही ते तयारी करत होते. बादशहा मात्र बिरबल पाहणी करत असल्याने निश्चिंत होता आणि त्याचे मत ऐकण्यासाठी उत्सुकही होता!

आणि बादशहाच काय सगळेच ! ज्या दिवशी बिरबल आपले मत सांगणार होता तेव्हा दरबारात प्रचंड गर्दी जमली होती.

‘खाविंद, आपण ही प्रवेश परीक्षा का लागू करण्यात आली ते समजून घ्यायला हवे.’ बिरबल सांगू लागला-‘ पूर्वी उमेदवाराच्या आधीच्या ज्ञानावर वा कौशल्यावर उमेदवाराची निवड होत असे. काही परीक्षा पूर्वीही होत्या. परंतु त्यांचे स्वरूप निराळे होते. परीक्षार्थींना प्रश्न माहित असत, त्यांची उकल, उत्तरेही माहित असत. त्यामुळे त्या परीक्षांमध्ये ठोकळेबाज तयारीला महत्त्व होते. माझा काहींना राग येईल; पण तो सोपेपणा आता उरलेला नाही. म्हणून अनेकजण रुष्ट आहेत, असं मला वाटतं.’


‘पण बिरबल, एखादा हुशार माणूस केवळ या परीक्षेच्या अडथळ्यामुळे योग्य ते पद मिळवू शकला नाही तर काय करणार?’ बादशहाने प्रश्न केला.

‘हुजूर, सर्वांना समान निकष म्हणून ही परीक्षा आहे. आणि ज्याला काम करायचे आहे, जो हुशार आहे, त्याने थोडा वेळ या परीक्षेसाठी द्यायला हवा. उमेदवाराच्या पूर्वीच्या कौशल्याचा विचार होणे गैर नाही. निवड प्रक्रियेचा तो एक भाग असावा जरूर. पण काही विशेष समस्या दिल्यास तो काय करतो, कसे निर्णय घेतो, याची तपासणी या परीक्षेत अभिप्रेत आहे. आणि ते आवश्यक आहे असं मला वाटतं. प्रत्यक्ष काम करणाऱ्या अनेक कारागीर, अभियंत्यांशी बोलून मी हे सांगतोय खाविंद. केवळ अभ्यासापेक्षा काहितरी वेगळं लागतं या कामांसाठी. आणि ते पूर्वीप्रमाणे होणाऱ्या परीक्षेत पाहिलं जात नाही.’

‘कोणतंही काम करायच तर त्यात त्याच त्याच समस्या पुन:पुन्हा येत नसतात. विशिष्ट प्रसंगी उत्तर समोर असूनही माणूस गडबडून जातो. आणि व्यवहारात कामासाठी पाहायचं तर आपल्या ज्ञानाच वापर अधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणून केवळ ज्यांची उत्तरे माहित आहेत असेच प्रश्न असणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. जे कौशल्य कलाकारत आहे त्याचा वापर करुन तो नव्या समस्या कशा सोडवतो हे आता बघितले जातं.’

जर एखाद्याने त्या त्या विषयातला अभ्यास पूर्ण केलेला असेल तर विशेष विद्यालयात जाऊन या परीक्षेची तयारी करण्याची खरं तर गरज नाही. आणि हे माझं मत नाही, या परीक्षेद्वारे निवड झालेल्यांचं आहे. परंतु या परीक्षेद्वारे शासनात काम मिळते या एका ध्यासापोटी अनेकजण इच्छा असो वा नसो या परीक्षेच्या मागे लागतात. आणि मग हाती निराशेशिवाय काही मिळत नाही. तेव्हा प्रजाजनांनी ही परीक्षा केवळ प्रवेशासाठी आहे हे ध्यानात घ्यायला हवे. या परीक्षेसाठी आपण जी कौशल्ये वापरतो त्यांचा पुढे उपयोग करणे आवश्यक आहे. नाहीतर आपण कामावरून काढून टाकतो हे लोक ध्यानात ठेवत नाहीत.’

‘योजकस्तत्र दुर्लभ:’ असं संस्कृतमध्ये म्हणतात. आणि या परीक्षेत गुणवंतांच्या योजकत्त्वाची चाचणी होते. त्यामुळे जहाँपनाह, ही परीक्षा रद्द करू नये. फार तर त्याच्या पूर्वीच्या कौशल्यावर आधारित एखादी मुलाखत अधिक ठेवावी. जेणेकरून केवळ परीक्षेत कमी पडल्याने एखादा उमेदवार अपात्र ठरणार नाही.’

‘वाह बिरबल, वाह! बहोत खूब! पटलं आम्हाला! अलबत! ही परीक्षा हवीच! आणि हो, आम्ही तुला प्रवेश देताना जी परीक्षा घेतली ती सार्थ ठरली असंच म्हणावं लागेल!!’

प्रेरणा -"हास्यमेव जयते" -तंबी दुराई (लोकसत्ता)