Monday, October 29, 2012

खाऊ किंवा गिळू!

बुफेतील या अन्नासंगे
युद्ध आमुचे सुरु
खाऊ किंवा गिळू!

सलाड, चटणी अन् कोशिंबीर
पापड व्यापी जागा भरपूर
रोटी-पुरीच्या जागेसाठी
यांना आधी गिळू !
                        खाऊ किंवा गिळू!


नाना भाज्या, दोनच वाट्या
पुरी, पोळी नि रुमाली रोट्या
अवजड थाळी, एकच हाती;
कशी काय मी धरू?
                        खाऊ किंवा गिळू!

विविधतेत ती पहा एकता
सर्व-पदार्थे लगदा होता!
चमच्याने ते गरगट खाता
मजा येत आगळू!!!
                        खाऊ किंवा गिळू!

पाणी! पाणी!! - मिळणे नाही!
भातासाठी फिरुया काही
अजुनि उरले पदार्थ सतरा
असे येतसे कळू!!
                        खाऊ किंवा गिळू!

टिमकी फुगली कितीही भयंकर!
डेझर्ट-वाचून ना गत्यंतर ! (हो! अशा ठिकाणी गोड-धोड म्हणायचीही सोय नसते!)
धक्काबुक्के, गर्दी तरीही
अंती विजयी ठरू!!
                        खाऊ किंवा गिळू!

हुश्श!! संपले युद्ध एकदा
जरा विसावा - टेकू आता !!
बुभुक्षितेच्या फेऱ्या झाल्या
संपूर्ण सु-फळू!!
                        खाऊ किंवा गिळू!


(गदिमा मला क्षमा करा !)

Friday, October 5, 2012

!ससंदर्भ स्पष्टीकरण! - २

"I'm a dog chasing cars. I wouldn't know what to do with one if I caught it!

संदर्भ - जोकरच्या तोंडी हार्वीस उद्देशून हे वाक्य आले असून ते सुप्रसिद्ध The Dark Knight या सिनेमातील आहे. Batman कोण आहे याचे गुपित Reese ने फोडले तर एक हॉस्पिटल मी उडवून देईन अशी धमकी जोकर देतो. त्यानंतर ज्या रुग्णालयात हार्वी असतो तेथे एका परिचारिकेचा वेश घेऊन जोकर जातो. त्याला पाहताच स्वाभाविकच हार्वी खवळून उठतो. जोकरच  रुग्णालयातील जखडलेल्या अवस्थेतही जोकरचा खात्मा करण्यासाठी त्याचे हात शिवशिवतात. तेव्हा अत्यंत बेरकी असा जोकर अत्यंत शांतपणे त्याला उद्देशून म्हणतो

स्पष्टीकरण - Dent ला जोकर चा राग आलेला आहे, याचे कारण म्हणजे त्याचे त्याचे झालेले विद्रुपीकरण आणि Rachel चा मृत्यू. जोकरच्या भन्नाट आणि विक्षिप्त कल्पनेने या दोन्ही गोष्टी घडलेल्या होत्या. पण तरीही Gordan चा  खोटा मृत्यू रचून पहिली खेळी आपल्या hero -पक्षाने केली होती हे आपण विसरू शकत नाही. त्यामुळेच जोकर सांगत आहे - "मी म्हणजे वेडा कुत्रा आहे - I'm a dog chasing cars. I wouldn't know what to do with one if I caught it!" - जोकर किती पराकोटीचा विक्षिप्त आहे ते अधोरेखित करणारं हे वाक्य आहे. त्याची वृत्ती ही पिसाटलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. अशा मनोवृत्तेची माणसे सुधारणे जवळपास अशक्य असते. म्हणूनच जोकर पुढे म्हणतो की "Cops have plans. Gordan's got plans" म्हणजे जोकरकडे हे अमुकच करायचं अशी काही योजनाबद्ध आखणी नाही. बेभान होऊन लोकाना छळणे हा त्याचा नित्याचा गुणधर्म आहे.

अशा समाजकंटकांची मनोवृत्ती अचूकपणे वेधणारे हे वाक्य आहे. एखाद्या मानसिक प्रवृत्तीला नेमके शब्दबद्ध करण्याची श्री नोलान यांची हातोटी येथे दिसते.

!ससंदर्भ स्पष्टीकरण! - १

"But it's not who you are underneath, it's what you do that defines you."

संदर्भ -  प्रस्तुत वाक्य ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित Batman Begins या चित्रपटातील आहे. ब्रूस वेन याची प्रेमिका कु. रेचल हे वाक्य ब्रूसला उद्देशून म्हणते. अनेक वर्षानी ब्रूस तिला काही सुंदर ललनांसोबत भेटतो, एका हॉटेलात. एकमेकांच्या डोळ्यात पाहून तेव्हा बालपणीचे वात्सल्य, आताची तीव्र आंतरिक ओढ आणि तरीही असहायता असे भाव दाटून येतात. त्यामुळे ब्रूस तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी हा जो बोलतो -वागतो आहे तसा मी नाहीये. Inside, I am more! त्यावर रेचल हे वाक्य बोलते.


स्पष्टीकरण - तुम्ही काय करता त्यावरूनच तुमची परीक्षा होते, तुमच्या मनात काय भाव आहेत ते कोणी तपासत नाही. जीवनातील एक अमूल्य तत्वज्ञान इथे विषद केले आहे. ब्रूस मनातून कितीही चांगला असो, तो असा उनाडपणे उघड्या नागड्या पोरींसोबत हिंडल्यावर रेचालला असे वाटणे तसे स्वाभाविक आहे. परंतु या वाक्यातून हेही प्रतीत होते की मुली या बाह्य रूप-कृतीवरच अनुमान काढून मोकळ्या होतात. त्यामागे काय कारण असू शकते याचा साधा विचारही त्या करीत नाहीत. याला असमंजसपणा म्हणतात.

पण तरीही आचरणासाठी मार्गदर्शक ठरेल असा विचार श्री नोलान इथे मांडतात यात शंकाच नाही. आपल्या चित्रपटात क्षणोक्षणी आणि जागोजागी असे विचार पेरणे, हा नोलान यांचा छंदच आहे - आणि त्यामुळेच ते चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात.