Sunday, September 26, 2010

एकाकी योगी

पालवी वसंते आता तर फुलली होती
आता कोठे ही हिरवाई भरली होती

तेव्हाच येतसे भाजत चराचराला
या धरणीवरती चंडरश्मीचा घाला

पेटला असे एकटा खडा मध्यान्ही
वरती खाली हा असे तप्त जणू वन्ही

पांथस्थ जातसे श्रांतशा तनामनाने
त्या उग्र दुपारी जी रणरणते ग्रीष्माने

सावलीच पुष्कळ देणारे भेटले
उधळून गंध तो छळणारे भेटले

तो केवळ त्याच्या तेजाने बोलतो
आरक्त फुलांनी नयनांना वेधतो

पांथस्थ पाहतो मान उचलुनी जेव्हा
मंद मलूल गळलेले समस्त तेव्हा

तो मात्र धीरसा उभा ठाकला आहे
जणू व्रतस्थ योगी तेजाने 'तप'तो आहे

लेवुनी फुले केशरी पिवळी वा रक्त
तेजाने तळपे अनलाचा हा भक्त

एकेक पुष्प देखणे फारसे नाही
ना सुगंध-अस्त्रे मोहवते ते काही

हिरव्या तरुगुच्छे पुष्प शोभती खास
हा तू देतसे भेट अशी अवनीस
....

वर्षानांदीस्तव सोसाट्याचा वारा
घन गर्जतील अन धो धो धो धो धारा

सर्वत्र नवे अंकूर नवा उल्हास
मातीच सुंदर दरवळणारा वास

हर्षोल्लासाने तोही नाचत आहे
ती तप-पुष्पे धरणीला अर्पित आहे

तो गुलमोहर तो झाला पुरता धन्य
धरणी त्याची ती सेवा करते मान्य

एकाकी तपाचे सार्थक येथे झाले
आता विसरो वा स्मरो कोणीही अपुले

पुनश्च तपणे आता ग्रीष्मी आहे
तोवरी समाधी घेउनी हिरवी राहे

समुदायामध्ये पेटती बहु ते पामर
एकटा पेटतो खास असा "गुलमोहर"


3 comments:

आशा जोगळेकर said...

ग्रीष्मा चाया तप्त झळा सहन करून ही आनंदाने फुलतो तो एक गुलमोहरच. त्याला तपस्वी म्हणा किंवा मनस्वी .

PRAASAADEEK said...

Waah,

Nakhashikhant Gulmohar .
Chaan vyaktichitra.
utkrushta bhasha.

maja ali.

sahdeV said...

wah wah....