आता कोठे ही हिरवाई भरली होती
तेव्हाच येतसे भाजत चराचराला
या धरणीवरती चंडरश्मीचा घाला
पेटला असे एकटा खडा मध्यान्ही
वरती खाली हा असे तप्त जणू वन्ही
पांथस्थ जातसे श्रांतशा तनामनाने
त्या उग्र दुपारी जी रणरणते ग्रीष्माने
सावलीच पुष्कळ देणारे भेटले
उधळून गंध तो छळणारे भेटले
तो केवळ त्याच्या तेजाने बोलतो
आरक्त फुलांनी नयनांना वेधतो
मंद मलूल गळलेले समस्त तेव्हा
जणू व्रतस्थ योगी तेजाने 'तप'तो आहे
लेवुनी फुले केशरी पिवळी वा रक्त
तेजाने तळपे अनलाचा हा भक्त
एकेक पुष्प देखणे फारसे नाही
ना सुगंध-अस्त्रे मोहवते ते काही
हिरव्या तरुगुच्छे पुष्प शोभती खास
हा ऋतू देतसे भेट अशी अवनीस
....
वर्षानांदीस्तव सोसाट्याचा वारा
घन गर्जतील अन धो धो धो धो धारा
सर्वत्र नवे अंकूर नवा उल्हास
मातीच सुंदर दरवळणारा वास
हर्षोल्लासाने तोही नाचत आहे
ती तप-पुष्पे धरणीला अर्पित आहे
तो गुलमोहर तो झाला पुरता धन्य
धरणी त्याची ती सेवा करते मान्य
एकाकी तपाचे सार्थक येथे झाले
आता विसरो वा स्मरो कोणीही अपुले
पुनश्च तपणे आता ग्रीष्मी आहे
तोवरी समाधी घेउनी हिरवी राहे
समुदायामध्ये पेटती बहु ते पामर
एकटा पेटतो खास असा "गुलमोहर"