Sunday, January 31, 2010

भाषांतर करता करता....




भाषेचा
जन्म कसा होत असेल?? खरंच मोठा गूढ प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीला आपण एक अमुकएक संज्ञा का वापरतो?? आता या वाक्यातच अनेक संज्ञा येऊन गेल्या. मग या संज्ञा बदलत असतील का? आता तुम्ही म्हणाल, हा सगळा उहापोह ज्याचं पोट भरलेलं त्यांच्यासाठीच आहे. ज्याला दोन वेळची भ्रांत आहे त्याच्यासाठी काय जी संवाद साधते ती भाषा !!
हे जरी खरं असलं तरी नेमका संवाद होण्यासाठी "भाषा" फारच महत्त्वाची ठरते. गेल्या काही वर्षांपासून भाषा हा माझ्या आवडीचा विषय झाला आहे. संस्कृतचा किंचित अभ्यास केल्याने असेल किंवा इतर कारणांनी असेल भाषेविषयी माझ्यां मनात अनेक कोडी आहेत. आणि "केल्याने भाषांतर" हे लिहिताना किंवा भाषांतरित गोष्टी वाचताना अशी अनेक कोडी पडली आहेत. काही दिवसांपूर्वी एक भाषांतर करण्याचा योग आला आणि वाटलं काय गंमत असते भाषेची!! निमित्त झालं IIT मधल्या एका स्पर्धेचं. spoken tutorials भाषांतरीत करण्याची ही स्पर्धा होती. एका software ची माहिती आयोजकांनी video मध्ये दिली होती. तो video मी इथे दिला आहे. तर, त्या video मधला audio कोणत्याही भारतीय भाषेत भाषांतरित करून द्यायचा होता. मी मराठीत केला. तोसुद्धा इथे आहे.
इथे भाषांतर, भाषांतर असं मी म्हणतोय खरं; पण हे सगळं करताना मला जाणवलंय, भाषांतर मध्येही "अंतराचा" उल्लेख आहे. हे अंतर पडता कामा नये / कमी व्हावं म्हणून जे करायचं त्याला "अनुवाद" म्हणणंच जास्त योग्य. किती समर्पक आहे : "अनु"-"वाद", दोन भाषा म्हणजे जणू वेगवेगळी दोन वाद्यं, आणि त्यांच्या तारा एकाच सुरात छेडल्याचा अनुभव आहे या शब्दात!! वाद्य वेगळी असली तरी सूर तोच हवा आणि पक्का हवा!! आणि "भाषांतर" करताना या गोष्टीला फार महत्त्व आहे. नाहीतर भाषेतलं अंतरच वाढतं!!
आता हीच गंमत पहा ना;TV वर आपण हल्ली अनेक मराठी कार्यक्रम बघतो.. तेव्हा अगदी हमखास असतं काय "अमुक अमुक कार्यक्रमा".... चे प्रायोजक आहेत ..... xyz ; ....यांच्या सहयोगाने (??).. xyz.
आता काय हे?? यांच्या सहयोगाने हे कुठून आलं ?? तर "in association with" चं शब्दशः भाषांतर!! आता ज्यांना "प्रायोजक" असं सुचलं त्यांना "सहयोगी प्रायोजक" सुचायला काय हरकत होतं? असो. त्यामुळे हे सरळ सरळ शब्दशः भाषांतर झालं. लहानपणी संस्कृत उतारे/ पद्य यांचं भाषांतर करताना आमचे गोवंडे सर नेहमी सांगायचे," भाषांतर वाचताना मूळ उतारा / पद्य याचं हे भाषांतर आहे असं वाटता कामा नये. प्रत्येक भाषेचा एक बाज असतो; तो राखून भाषांतर केलं की तो अनुवाद ठरतो. आता "Let me demonstrate this to you" किंवा "I have found that by trial and error" याचं भाषांतर कसं करणार? माझा video बघा तुम्हाला आपोआप कळेल! :P

दुसरा मुद्दा असा की भाषा ही कोणत्यातारी प्रदेशात / संस्कृतीमध्ये रुजते, जन्मास येते आणि विस्तार पावते. त्यामुळे काही शब्द असे असतात की ठरवलं तर ते भाषांतरित करता येतील. पण ते कानाला बरोबर वाटणार नाही. कारण सुरात नाही ना!! आता मराठीमध्ये "Press Enter after that" याचं भाषांतर "त्यानंतर प्रवेशाची कळ दाबा " असं केलं तर ते हास्यास्पद होईल!!! "त्यानंतर enter दाबा" हेच ठीक वाटेल. याला दुसरीही एक बाजू आहे : त्वरण, स्थितीज ऊर्जा वगैरे शब्द ऐकले की इंग्रजी माध्यमाची मुलं लगेच हसू लागतात. हे भाषांतर अनैसर्गिक नाही; इतकंच की त्या शब्दांची आपल्याला सवय नाही. इथे मी त्याबाबत सांगत नाहीये. बहुतांशी शब्दांना आपण "अनुवादित" करू शकतो. पण ज्या गोष्टी मुळात एखाद्या ठिकाणी नव्हत्या त्यांना उगीच ओढून ताणून आपल्या भाषेत आणण्याचा हट्ट कशाला? उदा. क्रिकेट, चॉकलेट अशा गोष्टी मूळच्या भारतीय नाहीत. मग फक्त अर्थ ध्वनित करण्यासाठी काहीतरी लांबलचक संस्कृतोद्भव शब्द कशाला जोडायचे?

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही विशेष प्रयोग. उदाहरणार्थ, वाक्प्रचार, म्हणी वगैरे. तर हे प्रयोग थोड्याफार फरकाने प्रत्येक भाषेत असतात. पण तिथे तो नेमका प्रयोग झाला तर मजा येते. When in Rome, do as the Romans do असं म्हटलं तर मराठीत ते देश तैसा वेश असंच व्हायला हवं. रोमन राज्यात रोमन लोकांप्रमाणे रहा(!!) असं चालणार नाही.

अशा अनेक गोष्टी आहेत. मी काही भाषातज्ज्ञ नाही. हा video करताना मला जे लक्षात आलं ते मी इथे लिहिलं. शेवटी काय, अनुवाद करताना आपण कोणाशीतरी संवाद साधतो आहोत हे लक्षात ठेवलं म्हणजे झालं!!

Thursday, January 14, 2010

संक्रमण

सूर्याचे संक्रमण म्हणून मकरसंक्रांत

पूर्वी आपण नातेवाईकांकडे जात असू , तिळगूळ वाटून आपल्या नात्यातली गोडी जपत असू ...
पण आज आपण फोन करतोच की , email करतोच की किंवा sms तरी करतोच करतो


आता हीच संक्रांत का महत्त्वाची, याच संक्रमणाला इतक्या गोष्टी का जोडल्या गेल्या, वगैरे प्रश्न पडतील ...
पण इतक्या खोलात जायच्या आधी जरा आजूबाजूला बघा तरी
संक्रमण , बदल हा चालूच असतो .. सगळीकडे सतत अगदी हरघडी !!

"माठ" आताशा नाही पहायला मिळत, पण म्हणून काही गार पाण्याची तहान संपत नाही !
आपण फ्रीज वापरून पाणी गार करतो !!!

पूर्वी दिवाळीच्या आधी घरोघरी फराळाची लगबग असे ..
आता फराळ विकत आणण्याची असते !!! :P

सायकली गेल्या , गाड्या आल्या, आता त्यातही बदल, संक्रमण होतंय ,
नवीन, कमी किंमतीच्या पण जास्त क्षमता असणार्या गाड्या येताहेत

पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे म्हणे; आता अमेरिकेत सोन्याचा धूर नसेल कदाचित;
पण अख्या जगाला काबूत ठेवण्याइतकी संपन्नता नक्कीच आहे !

हंहंहं !! पण काही विशेष बदल मात्र चुटपूट लावून जातात
आपण लहानाचे कितीही मोठे झालो तरी "लहानपण देगा देवा " असं सगळ्यांनाच वाटतं ;
कितीही पुस्तकं computer वर वाचता आली तरी प्रत्यक्ष पुस्तक वाचायला काही वेगळीच मजा येते !
एखाद्या मोठ्या सिनेनटीला आता आपल्याला रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी खाता येत नाही याचं दुःख असतं ;
तर कुणा कोकणातल्या म्हातार्या चाकरमान्याला मुंबईतून रेल्वेने कोकणात जाताना जुन्या काळचा गलबता तला प्रवास आठवतो

तर कुणीसं म्हटलंय त्याप्रमाणे बदल हे सदैव होताच असतात- Change is the only permanent thing in life

तसंच सूर्याचं हे मकरसंक्रमण, उत्तरायणाची सुरुवात!

संक्रमण हे तर चालूच राहणार;
मग इतक्या सगळ्या बदलांचा विचार करून उगीच चिंताक्रांत कशाला व्हायचं!
पण त्याच छानसं स्वागत तरी करूया की
तिळगूळ खाऊन, गोड बोलून, काय ?

तेव्हा तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!!!

मकर -संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Monday, January 11, 2010

केल्याने भाषांतर

विश्वामित्रपराशरप्रभृतयो वाताम्बुपर्णाशना
स्तेSपी स्त्रीमुखपंकजं सुललितं दृष्ट्वैव मोहं गताः |
शाल्यन्नं सघृतं पयोदधियुतं ये भुञ्जते मानवा
तेषां इन्द्रियनिग्रहो यदि भवेत् विन्ध्यः प्लवेत्सागरे ॥
(८०, भर्तृहरी कृत शृंगार-शतक )

वायु-
पर्ण नि पाणी पिऊनी
वीरक्तीने जे जगती ;
त्यांचे चित्तही मोहून गेले
सुन्दर त्या ललनांवरती !!!
तूप-दूध-दही नित्य सेविती
जर चित्त अशांचे ना ढळले
खासच तर मग म्हणूया आपण
पर्वत जलधीवर तरले !!!

आपलं जुनं वाङ्मय केवळ त्यागवादी आहे या कल्पनेला छेद देणारा भर्तृहरी कृत शृंगार-शतक हा एक ग्रंथ आहे.
खूप दिवसांपासून शृंगारशतकातील भाषांतर करायचं डोक्यात होतं. आणि हे पद्य वाचल्यावर तर मला राहवेना. पण कित्येक दिवस या पद्याच समांतर पद्य जमत नव्हतं. त्यात छंद जपायचा छंद असल्याने चक्क मी कागद घेउन कविता "जुळवू " लागलो. पण छे! व्यर्थ !! मग शेवटी की बोर्ड वरच बसलो, आणि झालं .. भाषांतर तयार