Wednesday, June 24, 2009

केल्याने भटकंती -(मस्तानी तलाव) -१

(हे माझं पहिलंच प्रवासवर्णन , प्रवासवर्णन म्हणाव का? खरं तर उन्हाने पार कंटाळलेला असताना मी या भटकंतीला गेलो. त्याचं वर्णन करावंस वाटलं, म्हणून लिहितोय. माझ्या इतर लेखांहून थोडं निराळंच आहे हे. त्या वेळी चुकलं इतकच की camera घेतला नव्हता. त्यामुळ सगळे फोटो samsung मोबाइलच्या 2 megapixel कॅमेऱ्याने काढले आहेत!)



पावसाची वाट पाहून आता कंटाळा आला होता. मुंबईतल्या पहिल्याच उन्हाळ्यात माझं शरीर आणि मन अगदी गळून गेलं होतं.
पण एस.टी. ने लोणावळा स्टॅण्ड गाठला आणि अंगाला गुदगुद्या करणारा गारवा जाणवू लागला. मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या सृष्टीनाट्याची नांदी इथे अशी झाली.
पुण्यात गेल्यावर पावसाची भेट झालीच! खरंच, पहिल्या पावसात चिंब भिजायचा, उन्हाळ्यात नदीच्या पाण्यात मनसोक्त खेळायचा आणि हिवाळ्यातल्या गर्द धुक्यात तोंडातून धूर सोडायचा आनंद काही औरच. पहिल्या पावसाने सुखावलेला मी आता उद्या कुठे भटकायचं याचा विचार करू लागलो.
सिंहगडावरच जायचं होतं खरं तर पण एकतर उशीरा उठलो. ओंकार(आमचे बंधुराज) तर बरोबर येणार होताच, पण अजून कोण येणार ते नक्की नव्हतं. दीप(माझ्या शाळेतल्या अनेक वल्लींपैकी एक, मुंबई ते चिपळूण सायकल प्रवासासारख्या अजब करामती करणारा) ‘हो’ म्हणाला तोपर्यंत उशीर झाला होता.

ओंकारचा एक वर्गमित्र- ‘आलोक(हासुद्धा माझ्यासारखा नाटकं, कविता यात रस असणारा आणि तरीही science चा विद्यार्थी)’ यायला तयार होता, पण त्याचं दुपारी १२ पर्यंत काम होतं. आणि मला संध्याकाळी ६ पर्यंत परत यायचं होतं.















तर अशा विचित्र अटींवर सिंहगडाशिवाय अजून कुठे जाता येइल याचा विचार करत होतोच.
ते रांजणखळग्यां (potholes) चं गाव, ‘निघोज’, त्याची माहिती काढून झाली, तर ते ९० किमी लांब! झालं ! म्हणजे ६ तासात ते अशक्यच!

"
मस्तानी तलाव". तिथे जायचं होतंच. पण २-३ मित्रांना विचारल्यावर, "दिवेघाटाच्या पायथ्याशी आहे कुठेतरी, पण इतकं काही नाहीए विशेष!" असं कळलं.
आमच्याकडे दोन दुचाकी(सोप्या मराठीत 2-wheelers) होत्या. स्कूटी व प्लॅटिना. कुठेतरी जायचं जरूर होतं. आणि वेळेचं बंधन होतं. अशा या परिस्थितीत मस्तानी तलावावरच जायचं ठरंलं.

दुपारी एक दिडच्या सुमारास निघालो. दीप व आलोक प्लॅटिनावर आणि आम्ही (मी व ओंकार) स्कूटीवर असे निघालो. वाहनचालक अर्थातच मी व दीप. रस्ता तसा सोपा होता. म्हणजे फार वेळा विचारावं लागला नाही. कॅम्पमधून जाता येता ‘हडपसर’ ची पाटी वाचली होतीच. त्यामुळे साधारण कसं जायचं त्याचा मी मनात एक आराखडा बनवला होता. तरीही एकदा आमची चुकामूक झालीच.परत
सासवड रस्त्याला लागेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच.

सासवड रस्त्याला दिवेघाट दिसायला लागला की थोडं आधी ‘वडकी’ गावातून मस्तानी तलावाकडे जाणारा फाटा लागतो. हा रस्ता बहुतांशी डांबरी आहे. पण तलाव घाटाच्या पायथ्याशी आहे असं कळल्याने आम्ही घाट अगदी अर्ध्या-एक किलोमीटर्वर येईपर्यंत जात राहिलो. इथे ‘सकाळ’चा प्रेस आहे, त्याच्या समोर, म्हणजे रस्त्याच्या डावीकडे मस्तानी तलावाकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे. आज पाऊस असता तर या रस्त्यावरून जाणं कठीणच होतं. पण आज नुसता ऊन आणि मळभ यांचा खो-खो चालू राहिला होता. काही अंतर गेल्यावर आता तलाव जवळ आला असावा आणि आता स्कूटीचा आणखी छळ करणं बरोबर नाही असं वाटून आम्ही गाड्या तिथेच लावल्या आणि चालू लागलो.

आजूबाजूला शेतं होती, वांगी आणि सीताफळांची. आम्हा शहरी पोरांना अशी शेतं बघितली तरी कोण आनंद होतो! शिवाय वाटोवाट साधारण ७-८ मीटर व्यासाच्या मोठाल्या नि खोल विहिरी होत्या.

जाता जाता दीप आपलं पक्षीनिरीक्षण कौशल्य पुन्हा आठवीत आम्हाला ‘हा आवाज तमक्याचा, हा अमक्याचा, हा पक्षी .... ’ असलं काहीतरी सांगत होता. पण वाटेने पुढे जाता जाता तलाव येइल अशी चिन्हे दिसेनात. आम्हाला जरा अशी शंका येते तोच तिथे एक घरटं नि शेजारी एक देऊळ दिसलं. त्या घराच्या मागे थोडा उंचवटा होता. १५ फूट उंचीचा असावा साधारण. तिथल्या बागुलबुवासारख्या दिसणा्ऱ्या, लांबलचक दाढी असणाऱ्या आजोबांनी तलाव तिथेच मागे असल्याचं सांगितलं. आणि चार पावलं चालल्यावर " वडकी जलसंधारण........ मस्तानी तलाव " की असली काहीशी पाटी दिसली. त्या पाटीचा फोटो मात्र राहून गेला! असो.

त्या घरामागच्या उंचवट्यावर गेल्यावर समोरच दिसला - "मस्तानी तलाव". आम्ही एकदम खूश झालो. तिथे असणाऱ्या गणपतीच्या देवळात माणसं उगीच काही माणसं काहीतरी गप्पा मारीत बसली होती. आता पुल म्हणतात त्याप्रमाणे बायकाच केवळ "कऽस्सऽऽलीऽऽ भाऽऽनगड?" असं विचारतात असं नाही. कधीकधी पुरुषही तशा वायफळ गप्पा मारताना दिसतात. त्यातलाच हा नमुना होता. पण नंतर लक्षात आलं ते मेंढ्या घेऊन आले होते. नि त्यांच्या शेळ्यामेंढ्या त्या विस्तीर्ण आणि विशाल अशा सुकलेल्या तलावात आरामात चरत होत्या. खरंच, त्या तलावाकडे पाहिल्यावर "विस्तीर्ण, विशाल, भव्य" इतकेच शब्द आठवतात.

केवढा हा तलाव! एका क्रिकेटच्या मैदानाएवढा तरी असेल. मोजकंच पण व्यवस्थित असं दगडी बांधकाम, एका बाजूला गणपती मंदिर, एका बाजूला घाट(पायऱ्या), एका बाजूला दिवेघाट आणि बाकी आजूबाजूला किरकोळ झाडी आणि शेतं ... अहाहा पावसाळ्यात हा परिसर काय नयनरम्य दिसत असेल! अर्थात आम्हाला तो आजही सुरेखच दिसत होता.

पुढे जाऊन तळ्यात वाकून पाहिलं; बापरे केवढी ही खोली. जवळजवळ ४५ फूट तरी असेल. पण एक मात्र खरं, तलाव हा सर्व ठिकाणी समान खोल नाही. आम्ही उभे होतो ती
तलावाची सर्वात खोल बाजू होती. व्यासाच्या दुसऱ्या टोकाला जेमतेम दोन अडीच माणूस उंचीचा तो तलाव पाहत आम्ही उभे होतो.


1 comment:

  1. "Lay bhari" :)
    Mala watla navhta itka lihita yeil yachyawar....tumcha patience khup ahe rao :D
    (mi tula persuade kartoy ka , mala 'punalalela' mhanayla" ? )

    ReplyDelete