Thursday, January 14, 2010

संक्रमण

सूर्याचे संक्रमण म्हणून मकरसंक्रांत

पूर्वी आपण नातेवाईकांकडे जात असू , तिळगूळ वाटून आपल्या नात्यातली गोडी जपत असू ...
पण आज आपण फोन करतोच की , email करतोच की किंवा sms तरी करतोच करतो


आता हीच संक्रांत का महत्त्वाची, याच संक्रमणाला इतक्या गोष्टी का जोडल्या गेल्या, वगैरे प्रश्न पडतील ...
पण इतक्या खोलात जायच्या आधी जरा आजूबाजूला बघा तरी
संक्रमण , बदल हा चालूच असतो .. सगळीकडे सतत अगदी हरघडी !!

"माठ" आताशा नाही पहायला मिळत, पण म्हणून काही गार पाण्याची तहान संपत नाही !
आपण फ्रीज वापरून पाणी गार करतो !!!

पूर्वी दिवाळीच्या आधी घरोघरी फराळाची लगबग असे ..
आता फराळ विकत आणण्याची असते !!! :P

सायकली गेल्या , गाड्या आल्या, आता त्यातही बदल, संक्रमण होतंय ,
नवीन, कमी किंमतीच्या पण जास्त क्षमता असणार्या गाड्या येताहेत

पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे म्हणे; आता अमेरिकेत सोन्याचा धूर नसेल कदाचित;
पण अख्या जगाला काबूत ठेवण्याइतकी संपन्नता नक्कीच आहे !

हंहंहं !! पण काही विशेष बदल मात्र चुटपूट लावून जातात
आपण लहानाचे कितीही मोठे झालो तरी "लहानपण देगा देवा " असं सगळ्यांनाच वाटतं ;
कितीही पुस्तकं computer वर वाचता आली तरी प्रत्यक्ष पुस्तक वाचायला काही वेगळीच मजा येते !
एखाद्या मोठ्या सिनेनटीला आता आपल्याला रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी खाता येत नाही याचं दुःख असतं ;
तर कुणा कोकणातल्या म्हातार्या चाकरमान्याला मुंबईतून रेल्वेने कोकणात जाताना जुन्या काळचा गलबता तला प्रवास आठवतो

तर कुणीसं म्हटलंय त्याप्रमाणे बदल हे सदैव होताच असतात- Change is the only permanent thing in life

तसंच सूर्याचं हे मकरसंक्रमण, उत्तरायणाची सुरुवात!

संक्रमण हे तर चालूच राहणार;
मग इतक्या सगळ्या बदलांचा विचार करून उगीच चिंताक्रांत कशाला व्हायचं!
पण त्याच छानसं स्वागत तरी करूया की
तिळगूळ खाऊन, गोड बोलून, काय ?

तेव्हा तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!!!

मकर -संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Monday, January 11, 2010

केल्याने भाषांतर

विश्वामित्रपराशरप्रभृतयो वाताम्बुपर्णाशना
स्तेSपी स्त्रीमुखपंकजं सुललितं दृष्ट्वैव मोहं गताः |
शाल्यन्नं सघृतं पयोदधियुतं ये भुञ्जते मानवा
तेषां इन्द्रियनिग्रहो यदि भवेत् विन्ध्यः प्लवेत्सागरे ॥
(८०, भर्तृहरी कृत शृंगार-शतक )

वायु-
पर्ण नि पाणी पिऊनी
वीरक्तीने जे जगती ;
त्यांचे चित्तही मोहून गेले
सुन्दर त्या ललनांवरती !!!
तूप-दूध-दही नित्य सेविती
जर चित्त अशांचे ना ढळले
खासच तर मग म्हणूया आपण
पर्वत जलधीवर तरले !!!

आपलं जुनं वाङ्मय केवळ त्यागवादी आहे या कल्पनेला छेद देणारा भर्तृहरी कृत शृंगार-शतक हा एक ग्रंथ आहे.
खूप दिवसांपासून शृंगारशतकातील भाषांतर करायचं डोक्यात होतं. आणि हे पद्य वाचल्यावर तर मला राहवेना. पण कित्येक दिवस या पद्याच समांतर पद्य जमत नव्हतं. त्यात छंद जपायचा छंद असल्याने चक्क मी कागद घेउन कविता "जुळवू " लागलो. पण छे! व्यर्थ !! मग शेवटी की बोर्ड वरच बसलो, आणि झालं .. भाषांतर तयार

Friday, December 4, 2009

तो आणि "तो" च्या निमित्ताने


तो....तो हे सर्वनाम नाही. म्हणूनच मी "तो" च्या निमित्ताने, असं लिहिलंय, त्याने असं लिहिलं नाही. तो ही व्यक्ती नाही, समष्टी आहे !

पुलंचं "व्यक्ती आणि वल्ली" कितीही वेळा वाचता येतं, एखादी कविता परत परत वाचली की त्यातून जसं नवं नवं मिळत जातं, तसंच या पुस्तकाबाबत आहे. ते केवळ विनोदी पुस्तक नाही, व्यक्तींचं 'वल्ली' म्हणून संपूर्ण चित्रण त्यात आहे. हां आता 'विनोदाला कारुण्याची झालर' वगैरे खूप वर्णनं अनेक मोठ्या लोकांनी करून ठेवली आहेत।


"माणसांचे दोष दाखवण्यात लोक आपला वेळ वाया का घालवतात ते मला कळत नाही" असं पुलं म्हणाले होते. पण म्हणून पुलं फक्त अवाजवी कौतुक करत नाहीत. ते माणसांना चालतं बोलतं करून आपल्यापुढे उभं करतात. आता आपण कुठे नारायणाला भेटलोय, की पेस्तनकाकांबरोबर प्रवास केलाय ? (!) पण तरीही त्या माणसांना आपण अगदी जवळून "ओळखतो", ते फक्त पुलंमुळेच! ...... हं, असं बरंच वर्णन करता येइल पण..... पण हा लेख काही समीक्षेचा नाही !

मला हे वाचल्यावर आणि पुलंचं अभिवाचन पाहिल्या-ऐकल्यावर आपणही या व्यक्ती-वल्लींना खरंच "बोलतं" करावं, असं फार वाटायचं. आणि मग परत एकदा जेव्हा मी "तो" वाचला, तेव्हा मला राहवेना.

म्हणून मी "तो"ला बोलता करण्याचा प्रयत्न केला। पुलं हे शेवटी पुलं आहेत, माझ्याकडून तेवढी अपेक्षा मला नाही, (तुम्हीही करू नका! :P)

ह्या लेखाचं श्रेय संपूर्णपणे पुलंना !!!






("तो" पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधील आहेमी फक्त अभिवाचन केलय )