Friday, December 26, 2008

दिनांक २६ नोव्हेंबर २००८

मागील लेखाला आता तीन आठवडे झालेत. आणि अजूनही खरं तर या blog जगात आल्यावर आपण ‘नित्यनेमाने’ काहीतरी लिहावं असं मनात होतं; पण ... असो!
आजचा दिवस २६ डिसेंबर असला तरीही गेले तीन आठवडे आपण सगळेच भारतीय त्या २६/११ प्रकरणातून मानसिकरित्या पूर्णत: बाहेर पडलेलो नाही. साहजिकच आहे. माझ्या कामाला थोडी विश्रांती असल्यामुळे असेल कदाचित; पण मी त्यासंबंधी विचार करतो. आणि दररोज येणाऱ्या बातम्या त्या विचारांना चालनाच देत असतात. अर्थात हे तीन आठवडे मला सुटी असल्याने, गेल्या काही दिवसात माझी खूप करमणूक झाली आहे; माझ्या महाविद्यालयात मी खूप मजा केली आहे. जे खरं असेल ते करायला आणि बोलायला कशाला घाबरा? "आई, चिंता करितो विश्वाची!" असे म्हणून विश्वकल्याणासाठी निघालेल्या योग्याची पात्रता माझ्याकडे नाही. (आणि कधी कधी वाटतं; का नाही? पण आपण जे आहे त्याकडे पहावं असा विचार मनात येतो. आणि मी जे आहे ते इथे मांडतो आहे. हे आहे माझ्या अवतिभवती, आणि स्वतः माझ्यात.
कोकण रेल्वेचा एक डबा: "अहो साहेब, ही तुमची bag इथेच राहिली की हो!!" .... "नीट बघा रं, काय बॉंब बिम्ब हाय काय त्येच्यात?" हे संभाषण अत्यंत संथपणे नेहमीच्या mood मध्ये होतं. अर्थात त्या bag मध्ये बॉंब नाहीच. म्हणून सर्व मजेत!
दूरदर्शनवरीलएका गायनस्पर्धेत एक स्पर्धक मुंबईची आहे. ती म्हणाली,"हे मुंबई spirit नाही, ही अपरिहार्यता आहे." खरंच आहे. मुंबईमधील सर्व लोकांची धावपळ तशीच चालू आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व कामे चालू आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात भिती नाही का हो? तणाव नाही का? पण शेवटी जगण महत्त्वाचं आहेच नाही का?
माझी एक काकू म्हणते,"पूर्वी काय झालं ते विसरा, आता या वेळेचं बोला. आता जे काही चालू आहे त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी आहेत. नेहमी बाबरी, १९९३, शिवसेना, गांधी या विषयावर चर्चा करता? हे विषय आता चघळून चघळून जुने झाले! त्या काही लोकांनी मानवी साखळी केली, त्यातून काय साधले. काहीतरी निश्चित कृत्य करायला हवे " काही अंशी बरोबर आहे तिचं; नाही का?
माझ्या कॉलेजमध्ये गेल्या आठवड्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेचे उपाय कडक होते. पण ते उपाय कडक म्हणून लोकं कुरबूर करत होती. मागील वर्षीपेक्षा प्रतिसादसुद्धा कमी होता... तर त्या कार्यक्रमांमध्ये बहुतेक कलाकारांनी आपापली कला त्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्यांना व नाहक बळी गेलेल्यांना अर्पण केली. पण एका कलाकाराचं मत वेगळं होतं- "मी माझा कार्यक्रम कोणाला अर्पण करणार नाही. आपण ही संध्याकाळ आनंदात घालवू, मजा करू; बास!! त्यातच आपला विजय आहे!"
चिपळूणमधील दै. सागर या वृत्तपत्राने शहीद शशांक शिंदे यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त एक खास पुरवणी काढली आहे. आजवर या पुरवण्या केवळ नेत्यांचे वाढदिवस, किंवा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशाच दिवशी निघत असत. त्यात हा उपक्रम मला स्तुत्य वाटला.
Times Of India मध्ये काही लोकांच्या या वर्षीच्या "new year partying" बद्दलच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दहशतवादी हल्ला नुकताच झाला असताना आपण अशी मजा करावी हे कित्येकांना मनातून कसंतरीच वाटत आहे. पण तरिही अनेक दिवसांनंतर मिळणारी ही मजा करण्याची संधी, त्यात मनावरचे हे अनेक दिवसांचे दडपण, त्यामुळे बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत "party"ने करण्याचे ठरवले आहे.
माझा एक भाऊ म्हणतो, " त्या हल्ल्याच्या वेळी एकाच्याही मनात आपण त्या अतिरेक्यांना काही फेकून मारावे, प्रतिकार करावा असं वाटलं नाही? इतकी माणसं होती, त्यातील एकही साधी bag देखील फेकून मारू शकला नाही?"
अशी एक ना दोन, अनेक मतं व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणतात ना, तसंच हे आहे. आपण प्रत्येकजण काही ना काही विचार करतोय, चिंता करतोय. निदान त्या बातम्या जेव्हा या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतात तेव्हा तरी आपण काहीतरी विचार करतोच. शिवाय आर्थिक मंदीचे सावटदेखील आहेच. मला मात्र या सगळ्याने जास्तच विचार करावा असं वाटू लागलं आहे. मुळापासूनच सगळ्यांनी बदलणं भाग आहे. या हल्ल्यांमुळे आपल्या संपूर्ण व्यवस्थेमधील दोष ठळकपणे समोर येऊ लागलेत. section 49-O सारखे emails येऊ लागलेत. (त्या 49-O मध्ये फारसे तथ्य नाही हे आपण जाणतोच! असो.) आपण चिडू लागलोय. हे बरंच झालंय. आता आपण असेच चिडलेले राहूया. क्रोधात शक्ती असते, पण तो क्रोधही योग्य ठिकाणी हवा. ती योग्यता कशात आहे ते आपण शोधूया.
आज एका महिन्याने मी हे फारच आदर्शवादी लिहितोय असं काही जण म्हणतील. पण तसं नाही आहे. मला एकच वाटतं ते हे की आपण कोणतंही काम करताना त्या हल्ल्यांना विसरता कामा नये. काहींच्या एका हलगर्जीपणामुळे केवढं संकट ओढवलं, किती प्राण गेले हे आठवावं. तो हल्ला आपण विसरू नये, उलट अधिक सतर्कतेने काम करत रहावं असं मला वाटतं. शेवटी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांच्या बॉम्ब्सचा आवाज आता तरी आपण ऐकावा. या धोक्याच्या घंटेकडे आता दुर्लक्ष करता उपयोगी नाही.

Tuesday, December 2, 2008

देश पेटला! आपण कधी पेटणार? की नुसतेच 'पेटवणार'?

दिनांक २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये जो गोळीबार व हल्ला सुरु झाला तो सतत ३ दिवसपर्यंत चालू राहिला. देशावर हा एक मोठा हल्ला होता. दहशतवादी हल्ला होता की नाही हे येणारा काळच सांगेल. कारण जूनपासून सातत्याने चालू असणाऱ्या इतक्या हल्ल्यांची दहशत आपल्याला (भारतीयांना) अजून बसली नाही; म्हणूनच की काय हा भयंकर संहार झाला.
देशातील जनमत आता प्रचंड प्रमाणात भडकले आहे. आणि आपले मंत्री नुसते राजीनामे देत सुटले आहेत. आपण इतके "पेटलो" आहोत की जिकडे संधी मिळेल तिकडे आपण आपला असंतोष प्रकट करत सुटलो आहोत. आणि वृत्तवाहिन्या, वाचकांची पत्रे, आकाशवाणी ; जिकडे तिकडे मंत्र्यांची (त्यांना खरंच देशाचे ‘नेते’ म्हणवत नाही) छी: थू चालू आहे. पण हे एक बरं झालं. या हल्ल्यांमुळे बॉम्बस्फोटांचा आवाज या देशातल्या ‘नागरिकांना’ ऐकू तरी आला.
पण मित्रांनो हा असंतोष तसाच धगधगत राहूदे. आज एकदा असंतोष प्रकट केलात की उद्या पुन्हा आहेच आपलं रोजचं रहाटगाडगं! तेव्हा वापरा थोडा असंतोष! १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला नियमितपणे, काहीही झालं तरी, मी माझ्या देशासाठी ध्वजवंदनाला गेलं पाहिजे. रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी त्या त्या नियमांनुसारच वागायला हवं , मग कोणतीही सबब चालणार नाही. म्हणजे एखाद्या वेळी नियम तोडलात आणि पकडले पोलीसाने, की दंड भरताना संकोच कसला ? राग कसला? तो पोलीस त्या लायकीचा नाही, तो पैसे खातो इ. इ.! म्हणून मी चुकलो ते बरोबर ठरत नाही. आणि मला सांगा तुम्ही तिथे पोलीस असतात तर काय केलं असतं? चालूद्या हो, हे असंच चालणार ; असं म्हणू नका. देशाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला आहे. ती वापरायला लागू आता! केवळ यंत्रणेतले (system मधले )दोष दाखवण्यापेक्षा आधी स्वत: ८०% वेळा तरी; ‘देशा’साठी म्हणून नियमांचं भान ठेवून वागूया.
दरवेळेला गरीबी ,असहायता म्हणून सहानुभूती कशाला? adjustment, compromise यांचा अतिरेक झाला म्हणूनच देशावर हा हल्ला होऊ शकला। बहुसंख्येसाठी (Quantity साठी ) गुणवत्तेचा (Quality)चा बळी कशाला ? ही सर्वोत्कृष्टतेची मागणी मीच करणार नाही तर कोण करणार? आणि इतरांशी तुलना कशाला? माझा सर्वोत्कृष्ट व्हायला हवा त्यासाठी "त्या देशात तसं असतं, हा देश इतका छोटा ,इतका उद्ध्वस्त झालेला, तरी त्याची प्रगती बघा", म्हणून इथे असं हवं; असं का म्हणायचं? "आपला देश महासत्ता व्हायला हवा"; बास ! यातच आलं सगळं। इतकं पेटायला हवं. शेवटी व्यावहारिक जगात तुलना आहेच की; पण ती केवळ व्यवहारापुरती असू द्यावी. प्रथम क्रमांकाला परिमाण प्रथम क्रमांकाचंच असतं अशी जिद्द, असा अट्टहास हवा.
आणखी एक म्हणजे, नको तितक्या सहानुभूतीचा आता त्याग करायला हवा. नको तिथे दया-माया उपयोगाची नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा पराभव अनुल्लेखाने करता येत नाही. हे सगळ्यांनी नुसतं समजून उपयोगी नाही, जिथे शक्य तिथे पटवून द्यायला हवं. या विचारसरणीचा पगडा जनमानसात बसायला हवा नव्हे बसवायला हवा. आणि कायमचं लक्षात ठेवायला हवं.
हा लेख वाचणारे निदान ‘e-साक्षर’ तरी आहेतच. लक्षात ठेवा; शहाणी माणसं गप्प बसतात म्हणून सगळं बिघडतं, मूर्खांमुळे नाही. अक्कलहुशारीने आणि मुत्सद्दीपणाने आपले मुद्दे ज्यांना कमी कळतं, जे पटकन अविचाराने भडकून उठतात; अशांना पटवूया. एवढ्या मोठ्या हल्ल्यांनंतरही आपण, स्वत:ला शहाणे म्हणवणाऱ्यांनीच, जर बदल घडवला नाही तर कोण घडवणार. दहशतवाद्यांनाच दहशत बसेल असा देश तयार करण्यात आपण आपला खारीचा वाटा तरी उचलूया!

पेटते राहूया!
http://www.loksatta.com/daily/20081202/edt.htm
http://www.esakal.com/esakal/12022008/Sampadakiya83E73329AB.htm